डाॅ माया पंडित यांचा डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्त्रीमुक्तीतील महत्वाच्या योगदानावरील लेख 

*स्त्रीमुक्तीचे शिल्पकार*

घटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने भारतातील कोट्यवधी गुलामांना त्यांच्या पशुवत जगण्याच्या खातेऱ्यातून बाहेर काढले. त्यातील प्रत्येकाला एक स्वाभिमानी, आत्मसन्मान जागा झालेला माणूस म्हणून जगायचा हक्क मिळवून दिला; देश कोणाचा हे ठरवायचा मताचा अधिकार मिळवून दिला. या देशाने स्वातंत्र्य, समता व बंधुभाव यांच्या मार्गाने जावे यासाठी भारताच्या राज्यघटनेचा नकाशा ज्यांनी बनविला, त्या आंबेडकरांचे आपण कृतज्ञतापूर्वक स्मरण करायला हवे, त्यांच्या कार्याचे मोठेपण समजून घ्यायला हवे. 

— — — — — — — — — — — — — — 

*मानवमुक्तीचा मंत्र*

अर्थात डॉ. आंबेडकराचे कार्य केवळ स्त्रियांपुरते सीमित नाहीच. समाजातील सर्व शोषित व अन्यायग्रस्त लोक हे त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी होते. म्हणूनच तर जर समाजात सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित झाली नाही तर विषमतेमध्ये खितपत पडणा-या लोकांच्या असंतोषाचा क्षोभ उसळून राजकीय लोकशाहीचा हा डोलारा केव्हाही कोसळून पडू शकतो, हा त्यांनी दिलेला इशारा किती खरा आहे हे आपल्या सद्य परिस्थितीवरून लक्षात येऊ शकते. 

त्यांनी दिलेल्या घटनेच्या गळ्यालाच नख लावण्याचे नवे कारस्थान २०१४ साली या देशात सुरू झाले आहे. नागरीक म्हणून दिलेले जनसामान्यांचे अधिकार त्यांच्या हातून हिरावून घेऊन त्यांना छळछावण्यांमध्ये टाकण्याची योजना कार्यान्वित करण्याचेही कारस्थान सुरू आहे. अशा वेळी डॉ. आंबेडकरांना केवळ जातीत बंदिस्त करण्याचे  षडयंत्र ओळखले पाहिजे. दलित जातींबरोबरच भटके विमुक्त, अन्य अल्पसंख्य, छोटे-मध्यम शेतकरी, शेतमजूर, कामगार, मध्यमवर्ग, स्त्रिया या सर्वांप्रति असलेली त्यांची निष्ठा समजून घेऊन त्यांचा वारसा आपण पुढे चालविला पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वांवर आधारलेला घटनाधिष्ठित समाज निर्माण करण्याचे कंकण हाती बांधून आपण यापुढची वाटचाल केली पाहिजे.
____________________________