तसा तू प्रत्येक पोरालाच भेटत असतोस आयुष्यातल्या दगडधोंड्यांच्या वळणावर. तेव्हा तू असतोस त्यांच्यासाठी शाळेतल्या मास्तरापेक्षा कितीतरी मोठा गुरू. मग ती पोरं आपल्या बापाचंही ऐकत नाहीत. कारण तुझ्याकडे असलेल्या अनुभवाच्या शिदोरीवर त्यांची भूक भागणार असते. पण खरं सांगतो चंक्या, तू त्यांना बिघडवायला तयार झालेला नसतोस आणि तू खोटारडाही नसतोस. कारण तुझ्याही आयुष्याची असते एक गोष्ट. ज्यात तू मक्याच्या कणसासारखा जातीच्या विस्तवात होरपळून निघालेला असतोस आणि व्यवस्था तुला मिटक्या मारत खात असते. तेव्हा तू जात्यांध जनावरांपुढील बिरमुटा झालेला असतोस. जब्यासारखी वासरं जेव्हा तुझ्यावर विश्वास ठेवतात, तेव्हा ती कधीच नसते एका ऐतिहासिक घोडचुकीची कहानी. कदाचित त्यातूनच एक यल्गार फुलणार असतो आणि तो कडब्याची गंज पेटवल्यासारखा जातीलाच भरदिवसा जाळणार असतो.
प्रिय धुरपे,
इथल्या व्यवस्थेने हजारो जब्यांना कुजवलं पण तू हजारो वर्ष या जुलमी जाळात धुपतच राहिलीस. सरतेशेवटी राख झालीस. त्यामुळे तुझी शोकांतिका मला जब्यापेक्षाही मोठी वाटते. जब्याला विद्रोहाचा सुरुंग व्हायला जातदांडग्यांनी आधी तुला 'डुकरीणे' म्हणावं लागतं. तेव्हाच जब्याची वात पेटते आणि व्यवस्थेला बेचिराख करत सुटते. पण तुला स्वतःला कधीच पडत नाहीत 'तोफ' व्हायची स्वप्ने. कारण तू धुरपी आहेस. जब्या तोंडी लावण्यापुरता शाळेत तरी जाऊ शकतो पण तू शाळेचे तोंड पाहिलं आहेस कि नाहीस? याचा थांगपत्ताच नाही. धुरपे... तुझं झाड आताशा वाढायला लागलंय. तेवढ्यात त्याला कलमाचा आधार देऊन नव्याने फुटवायचा प्लॅन स्ट्रक्चर्ड आहे. त्यात तुला काय वाटतंय? याचं कुणालाच काही पडलेलं नाही ग. तुला वरून छाटायचं आहे आणि कुणाला तरी जोडायचं आहे. बस्स इतकच... तुझ्या स्वप्नांच्या पाखराची केव्हाच शिकार झालीय.
प्रिय शालू,
यात तुझी काय चूक म्हणावी? तेच कळत नाही. कारण तू कधी डुक्कर पकडलच नाहीस. जातीची भिंत ओलांडून पलीकडे कधी गेलीच नाहीस. तुझ्याभोवती प्रस्थापित महाल होता त्यामुळे विस्कटलेल्या खोपटात डोकवायची तुला जाणच नव्हती. तुला फक्त चुलीवर शिजलेलं अन्न माहित होतं. पण तुला जेवण मिळावं यासाठी चुलीच्या बुडाखाली कोळसं झालेले निखारे तुझ्या गावीही नव्हते. शालू... त्याचा सगळा दोष तुला आहे असं मुळीच नाही ग. ज्या व्यवस्थेने आईच्या पोटातून पहिलं पाऊल ठेवल्यावर तुला जातीचं लेबल लावलं तीच मुळात सडकी आहे. त्यामुळे तुझ्या उमललेल्या रोपट्यावर नाही तर त्याच्या मुळाशी खतपाणी घालणाऱ्या व्यवस्थेवर माझा रोष आहे.
प्रिय जब्या,
तुझ्या वयाच्या पोरांची स्वप्नं निरागसच असतात रे. त्यातली भयानकता तेव्हाच कळते जेव्हा आपण त्याचा डुक्कर पकडण्यासाठी धावल्यासारखा पाठलाग करतो. आपल्याला फक्त लाल गुलाबच दिसत असतं. तोपर्यंत गुलाबालाही अनेक जाती असतात हे आपल्याला माहितच होत नाही. पण एक वेळ अशी येते की, खोडावरच्या काट्यांशी झुंजत आपण जेव्हा फुलाला बिलगायला जातो तेव्हा ते झाडच कुणीतरी छाटून टाकतं आपल्या आशावादी हातांसहित. तेव्हा जन्मांधाने चाचपडत चालल्यासारखं भविष्यच अंधारून येतं. मग आपण त्याला नशीब समजतो सटवीनं आपल्या कपाळावर लिहिलेलं.
जब्या... व्यवस्थेला तू दगड मारलास आणि थेट्रातला पिक्चर संपला. तू अशा कित्येक जब्याच्या हातांना बळ दिलंस. म्हणूनच तू आज अनेकांच्या काळजात आहेस व्यवस्थेला मारायचा दगड बनून... पण जब्या तुझी काळजी वाटते रे. तू दगड मारल्यानंतर तुझं काय झालं असेल? या खोल विचाराने.
-विक्रम मारुती शिरतोडे
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji