युरोपच्या अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘औद्योगिक क्रांती’चे पडघम वाजू लागले. तंत्र-यंत्राधारित उत्पादन-पद्धतीमुळे, मानवी क्षमतेच्या कल्पनेपलिकडची अशी प्रचंड उत्पादनवृद्धी झाली…. आणि, त्यासोबतच, श्रमिकवर्गासाठी उघडला गेला एक, अनंत यातना व शोषणाचा ‘पँडोराज् बाॅक्स्’! त्यातून प्रथम बाहेर पडली ती ‘बेकारी’ची समस्या आणि त्याला बिलगून पाठोपाठ अंतहिन-अमानवी ‘शोषणा’ची समस्या !! सार्वत्रिक भ्रष्टाचार, स्वातंत्र्याचा संकोच, नीतिशून्य व्यवहार व मानवी-अस्तित्वालाच ग्रहण लावणाऱ्या, निसर्ग-पर्यावरणावरील विध्वंसक आघातासारख्या सर्वव्यापी समस्यांची काळी मालिकाच एकापाठोपाठ एक, त्या ‘पेटी’तून बाहेर पडती झाली !!!
सदरहू औद्योगिक-क्रांतिने, सन्मानाने आणि सुखसमाधानाने जगण्याचे पिढ्यापिढ्यांचे पारंपारिक व्यवसायच उध्वस्त करायला घेतल्याने, कारखान्यांसमोर बेकार मजुरांच्या लांबच लांब रांगा लागू लागल्या. गरजेपेक्षा जास्त मजुरांच्या उपलब्धतेमुळे, कमीतकमी रोजावर काम करणाऱ्याला, घाण्याच्या बैलासारखं कामाला जुंपलं जाऊ लागलं…. ‘सूर्योदय ते सूर्यास्त’, सोळा ते अठरा तासांचा जणू कामाचा शिरस्ताच बनून गेला. कामावर जायला उशीर झाल्यानं ‘खाडा’ होऊ नये म्हणून, कित्येक कामगार गिरण्या-कारखान्यांच्या गेटवरच खाटा टाकून झोपू लागले. कोंदट, अनारोग्यकारक जागेत दीर्घकाळ काम केल्यामुळे अनेक व्याधी जडून, कामगारांचं अवघं जगणं नासलं… आयुर्मान घटलं…. कामगारांचं जीवन जणू एक रौरव नरक बनलं!
जोपर्यंत, कार्ल मार्क्सच्या डाव्या तत्त्वज्ञानाने भांडवलशाही समोर ‘शड्डू ठोकत’ आव्हान उभं केलं नव्हतं, तोपर्यंत कामगारांच्या नरकयातना आणि जिविताची भांडवलदारवर्गाला यःत्किंचितही पर्वा करण्याचं कारणच नव्हतं. तो काळ स्मरायचा म्हटला की, ‘मशिन’ नांवाच्या एका इंग्रजी चित्रपटातलं दृष्य नजरेसमोर हटकून उभं रहातं….. कापड गिरणीचा भोंगा वाजतो…. पाॅवरलूम्सचा खडखडाट सुरु होतो आणि तितक्यात एका कामगाराचा हात ‘मशीन’मध्ये अडकतो…. रक्ताच्या चिळकांड्या उडतात, त्या थेट विणलेल्या कापडाच्या ताग्यावर…. मालक संतापानं ओरडतो, “अरे! हटवा त्याला, हरामखोराने चार-पाच वार माझं कापड खराब केलं!!” ….. त्या गिरणी मालकासाठी चार-पाच वार कापडाची किंमतही, मानवी आयुष्यापेक्षा जास्त होती… तेव्हाही आणि आत्ताही! ठाणे-डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीतल्या भीषण स्फोटाला तीन वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर, हा मजकूर लिहीत असतानाच बर्नपूर-कोलकाता येथील स्टील अॅथाॅरिटी ऑफ इंडियाच्या पोलाद प्रकल्पात १६४०° तापमानाचे ७५ टन वितळलेले पोलाद अंगावर पडल्यामुळे ६ कंत्राटी-कामगारांचा भाजून मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी येऊन थडकली…. कामगार कंत्राटी, म्हणजे या नव्या व्यवस्थेतले “गुलाम आणि नव-अस्पृश्य”, म्हणजे त्यांची जीवाची पर्वा करतो कोण आणि त्यांच्या जीवाची किंमत ती काय? नेहमीप्रमाणेच, यथास्थित सखोल चौकशीची आश्वासनं दिली जातील, चौकशीचे सोपस्कार पार पाडले जातील; पण, “कंत्राटी-कामगार पद्धती”तल्या ‘गुलामी व नव-अस्पृश्यते’चा एकही ‘चिरा’ ढळणार मात्र नाही.
नफेखोरीने माणसाला किती स्वार्थांध व क्रूर बनवलयं, याचा प्रत्यय आजही आपण हरघडी जगण्याच्या सर्वच क्षेत्रात घेतोयं…. ज्यामुळे, आजकाल वैद्यकियपेशा करणारे ‘धन्वंतरी’सुद्धा समाजाचे ‘लुटेरे’ व प्रसंगी हव्यासापोटी रुग्णांचे ‘यमराज सहोदरः’ या नात्यानं ‘मारेकरी’ही झालेले, आपण उघड्या डोळ्यांनी रोज पहातोय…. म्हणूनच तर, या व्यवस्थेचा उल्लेख आम्ही ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन “रक्तपिपासू-शोषक व्यवस्था” असा यथार्थपणे
करत असतो…. पण, चंगळवादी जीवनशैलीमुळे, स्वार्थापोटी व जगण्यातल्या असुरक्षिततेमुळे एकूणच समाजाच्या संवेदनाच,
बोथट झाल्यात…
पुराणकालातील एखाद्या ‘महर्षी’चीच योग्यता अंगी धारण करणाऱ्या, १९व्या शतकात ‘डॉक्टरेट’ झालेल्या या महान दार्शनिकाने, देशोधडीला लागलेल्या सर्वहारा ‘नाही रे’ वर्गासाठी आपली संपूर्ण कारकिर्द अन् जीवनसर्वस्व पणाला लावून स्वत: देशोधडीला लागणं पत्करलं…. इंग्लंडमध्ये दोन खोल्यांच्या घरात निर्वासिताचं जीवन तो जगला! कमालीच्या विवंचनेपायी आपली तीन अपत्ये त्याने गमावली. जर्मन ‘उमरावकन्या’ असलेल्या, त्याच्या स्वरुपसुंदर पत्नीला… जेनीला, भणंग जीवन जगावं लागलं. पण, मरेपर्यंत तिने त्याची साथ सोडली नाही. तशीच अखंड-अभंग साथ निभावली त्याच्या तत्त्वचिंतक सहकारी आणि जिवलग मित्र फ्रेड्रिक एंगल्सने. ‘दास कॅपिटल’ हा ऐतिहासिक ग्रंथ लिहीणाऱ्या, कार्ल मार्क्सचं जेनी आणि एंगल्स, एवढंच ‘कॅपिटल’…. एवढीच आयुष्यभराची कमाई… जमा झालेली पुंजी… राॅकफेलर, बिल गेट्स, वाॅरन बफे यांच्या एकत्रित धनसंपदेलाही मान झुकायला लावणारी!
त्याच्या स्वप्नातली कामगार-क्रांति, इंग्लंड-जर्मनीऐवजी रशियात झाली खरी. पण, ती पहायला तो हयात नव्हता. तिथून पुढे चौखूर उधळलेल्या साम्यवादाच्या अश्वमेधी वारुच्या मार्गात येणाऱ्या, सामंती, भांडवलशाही, हुकूमशाही राजसत्ता धाराशायी पडू लागल्या नि अर्ध्याअधिक जगावर ‘लालबावटा’ डौलाने फडकू लागला! तत्कालीन आणि त्यानंतरच्या प्रतिभावंतांच्या पिढ्यांना मार्क्सवादी विचारांनी गारुड घातलं… ते आजवर! २००८च्या पाश्चिमात्य जगतातील महामंदीने, जगाला पुन्हा एकवार ‘कार्ल मार्क्स’ची तीव्रतेनं आठवण करुन दिली…. ‘दास कॅपिटल’सारख्या मार्क्सच्या ग्रंथांवरची साचलेली धूळ उडू लागली…. जगभर हातोहात लाखो प्रती तेव्हा अल्पावधित विकल्या गेल्या.
साम्यवादी क्रांतिच्या या धसक्याने नि, हिसक्यानेसुद्वा धास्तावलेल्या भांडवलदारवर्गाला मार्क्सच्या कामगार-कल्याणाच्या सूचना नाईलाजाने का होईना; पण, तातडीने अजेंड्यावर घ्याव्या लागल्या. त्यामुळे कामगारांचे कामाचे तास नियमित झाले. साप्ताहिक सुट्टी मिळाली. ‘जादा काम, जादा दाम’ हे तत्त्व मान्य झालं. जगभरात कामगारांना बोनस देऊन नफ्यात वाटेकरी करण्यात येऊ लागलं. विमा, आरोग्यसेवा, पाल्यांना शिक्षण, वाहनव्यवस्था इत्यादी सुविधा पुरविण्यात येऊ लागल्या. अशाप्रकारे कामगार-कर्मचाऱ्यांचं दैन्य बव्हंशी दूर पळालं. पण, किती कामगार-कर्मचाऱ्यांना आज याची जाणिव आहे? मार्क्स जर झाला नसता तर, हे सर्व घडलं असतं ??
दुर्दैवाने, जसं आजवर जगात अनेक महापुरुषांच्या बाबतीत घडलं आणि घडतं आलयं…. तेच, मार्क्सच्या बाबतीत घडलं! कार्ल मार्क्सच्या विचारसरणीचे सर्वात मोठे मारेकरी भांडवलदार नव्हे; तर, अनेक ठिकाणी ‘बाबा वाक्यम् प्रमाणाम्’ वृत्तीचे, स्वतःला पोथीनिष्ठ ‘मार्क्सवादी’ म्हणणारेच ठरले. यामुळेच असेलं कदाचित, असं म्हणतात की, स्वतः कार्ल मार्क्स म्हणाला होता की, “नशीब, मी मार्क्सवादी नाही!”
मार्क्सवादाच्या जगभरच्या दुर्दैवी पिछेहाटीमुळे, आज दगडी शिळेखालचा आपला हात बाहेर आल्यामुळे, भांडवलदारवर्गाने, हळूहळू पुन्हा आपले दात विचकायला आणि नखं परजायला सुरवात केलीय… जगभर व्यक्ति-स्वातंत्र्याची मशाल हाती घेऊन, चीन-रशियाच्या ‘पोलादी पडद्या’वर कठोर टीका करणाऱ्या या भांडवलशाहीनं, ‘डेमॉक्रसी’चा गळा साफ घोटून जगभरच्या मानवी समूहावर ‘कॉर्पोरेटोक्रसी’चं आक्रमण लादलयं…. सध्याच्या
‘रेन्समवेअर’ संगणकीय व्हायरसपेक्षाही ‘कॉर्पोरेटोक्रसी’ने घातलेला धुमाकूळ विश्वव्याप्त आहे…. त्यामुळे, करोडो करोडो आत्म्यांच्या आक्रोशाला आता, स्वातंत्र्याचा वा सन्मानाचा साधा ‘हुंकार’ देणंही, परवडणारं राहीलेलं नाही… ‘व्यक्तिस्वातंत्र्य’, ही केवळ शोभेची किंवा चैनीची बाब सद्यस्थितीत झालीयं…. पुढे येऊ घातलेल्या ‘नॅनोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स्, रोबॉटिक्स्’च्या कालखंडात तर, या महान मानवी-मूल्यांची साधी ‘टिक टिक’ही ऐकू येणं अशक्य होईल!
‘मार्क्स आणि मार्क्सवाद’ कालबाह्य झाल्याच्या वल्गनांचा ‘डांगोरा’ दाही दिशांनी पिटणं सुरुच आहे…. याही स्थितीत, हताश आणि दिशाहिन झालेल्या तळागाळातील आजच्या तरुणाईला कार्ल मार्क्ससारखे विचारवंत संपूर्ण वाचता नाही आले तरी, निदान त्यांनी ते समजून घेतले पाहीजेत. शेवटी, “माणूस आणि निसर्गाचं शोषण” थांबवू पहाणाऱ्या जातिवंत मंडळींची ‘नाळ’ कुठेतरी जुळलेली असायलाच हवी…
जर, कधि मार्क्स भारतात जन्म घेता झाला असता तर, काय लोकविलक्षण घडलं असतं, याची सुखसंकल्पनाच मन नुसतं मोहवून टाकते. अलौकिक व अमोघ असं ‘भारतीय तत्त्वज्ञान’ आणि कार्ल मार्क्सची वैचारिक व तात्त्विक मांडणी, याचा महन्मंगल मिलाफ व ‘सात्विक-संयोग’ पिढ्यापिढ्यांना सुयोग्य मार्गदर्शन करता झाला असता. आज, ज्या औद्योगिक-संस्कृतिच्या आणि पाश्चात्य जीवनशैलीच्या उण्यापुऱ्या तीन-चार शतकी वाटचालीनचं केवळ, पृथ्वीवरील मानवीसमूहासह अवघ्या सजीवसृष्टीचं अस्तित्व धोक्यात आलयं, तेव्हा हा विचार मनात रुंजी घातल्याशिवाय रहात नाही….
“श्रमिकांचं जगणं म्हणजे, नुसतच केवळ ‘वर्गलढ्या’चं संघर्षपूर्ण मैदान असचं नव्हे; तर, सामान्यांचं जगणं, हे समन्वयाचं सांस्कृतिक-सरोवरसुद्धा आहे”, याची प्रचितीही मार्क्सला, निसर्गाला ‘देवता’ मानून जगणाऱ्या भारतीय जगण्यातून (विशेषतः, मायमराठी-संस्कृतिमधून) आली असती…. त्यातून, मार्क्सची तात्त्विक-मांडणी अधिक सघन-संपन्न झाली असती आणि अवघ्या विश्वाला ते ललामभूत झालं असतं. भारतीय-तत्वज्ञानानं ‘संपत्ती-निर्मिती’ कधिच त्याज्य मानली नाही; पण, “सर्वेपि सुखिनः संतु, सर्वे सन्तु निरामयः”, हा आमच्या भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा राहीलेला आहे. “त्येन् त्यक्तेन् भुंजिथः”, असा त्यागयुक्त उपभोग, हे आमच्या तत्त्वज्ञानाचं सार राहीलेलं आहे.
आपल्याला ‘कार्ल मार्क्स’च्या तात्त्विक-मांडणीत श्रीकृष्णाचा जीवनसंदेश व शिवछत्रपतींची राजनीति पानोपानी सातत्याने डोकावल्यासारखी वाटत रहाते…. यात आश्चर्य ते काय??? म्हणूनच, अंति सर्वांच्याच मुळावर उठणाऱ्या पाश्चात्य-संस्कृतिवर आधारलेला निर्मम औद्योगिक-जगताचा सारीपाट नव्यानं, पूर्णतः निसर्गस्नेही व माणुसकी-भूतदयेनं भारलेल्या ‘भारतीय-तत्त्वज्ञाना’वरच केवळ आधारलेला उभारणं, ही काळाची निकडीची गरज आहे….. कार्ल मार्क्संच्या स्मृतीदिना निमित्त हाच खरा संदेश आजच्या तरुण पिढी समोर ठेवणे हेच खरे कार्ल मार्क्संना विनम्र अभिवादन व क्रांतीकारी लाल सलाम 🙏🌹🇹🇷🌹🇹🇷🙏
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji