सोपं दान !

लिसा रे , युवराज सिंग,मनीषा कोईराला,आर आर आबा,सोनाली बेंद्रे,इरफानला कॅन्सर झाल्याचे ऐकतो आपण...
हे सर्वजण सेलिब्रिटीज आहेत  म्हणून त्यांच्या कॅन्सरची चर्चा झाली,होते...
पण एकूणच सर्वसामान्यांमध्ये कॅन्सरच्या वाढलेल्या  प्रमाणाबद्दल अधिक लिहिलं बोललं जायला हवं,ते माध्यमांमधून होताना दिसत नाही.
कॅन्सर होऊ नये म्हणून जीवनशैलीत जे बदल व्हायला हवेत त्याबद्दल खूप खूप जनजागृतीची गरज आहे.
तोंडाचा,जीभेचा कॅन्सर तंबाखू, गुटखा यांच्या सेवनाने होतो.दारू पिल्याने लिव्हरच्या कॅन्सरची शक्यता बळावते.अति प्रमाणात प्राणिजन्य चरबी आहारात असेल तर मोठ्या आतड्यांच्या आणि स्तनांचा कॅन्सरची शक्यता वाढते.
अतिताण,अतिमसालेदार खाणं (hurry, worry and curry)  जठराच्या कॅन्सरला कारणीभूत ठरते.
लवकर लग्न आणि संभोगाची लवकर सुरवात,योग्य अंतर न ठेवता झालेली खूप बाळंतपणे, वारंवार करून घेतलेले गर्भपात आणि जननेंद्रियांची अस्वच्छता ही गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची कारणे आहेत.
आहारामध्ये सर्व आवश्यक व्हिटॅमिन्स घेतल्यास ते अँटी ऑक्सिडंट्सचे काम करतात आणि काही प्रमाणात कॅन्सर होणे टळू शकते.

कॅन्सरचे अक्षरशः लाखो प्रकार आहेत.
प्रत्येकाचे कारण वेगळे,उपचार वेगळे...
इरफानला neuroendocrine म्हणजे मेंदूतील संप्रेरके स्त्रवणाऱ्या पेशींचा कॅन्सर होता असे कळतेय.

लिसा रे,सोनाली बेंद्रे यांना रक्ताचा कॅन्सर होता,आहे.
या प्रकारच्या कॅन्सरना विशिष्ट व्यसन,किंवा सवयी कारणीभूत नसतात.अनुवंशिकता हे कारण असू शकते.
व्यक्तीची काही चूक नसताना आपल्या पेशींमधील  गुणसूत्रामध्ये  म्युटेशन्स नावाचे बदल घडल्यामुळे काही पेशी अनियंत्रीतपणे वाढतात.आपल्या अन्नात,पाण्यात असलेले कीटकनाशकांचे प्रमाण हे काही प्रमाणात असे बदल घडवून आणू शकते असे रक्ताच्या कॅन्सरचे स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणतात.
जगभरातील भांडवलदारांच्या कृपेने आपण आणि आपल्या पुढील पिढ्या या प्रकारच्या कॅन्सरना अधिकाधिक प्रमाणात बळी पडणार आहोत.
रक्ताच्या  काही कॅन्सरवर बऱ्याचदा  कीमोथेरपी बरोबरच बोन मॅरो ट्रान्सप्लांट किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांट (रक्तातील सर्व घटक तयार करणाऱ्या मूळ पेशी बदलणे) केल्यास रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.
यासाठी रुग्णाच्या पेशींचं दात्याच्या पेशींबरोबर एच. एल.ए  टिश्यू मॅचिंग करावं लागतं.
भावंडे ,आईवडील यांचे एच एल ए मॅच झाले तर ट्रान्सप्लांट सोपे  आणि कमी खर्चिक असते पण ते नाही झाल्यास donor registry ला नोंद करावी लागते.बऱ्याचदा मॅचिंग दाता मिळेपर्यंत वाट बघावी लागते.
इतर अवयवदानाच्या तुलनेत बोन मॅरो दानाबद्दल फारशी जनजागृती नसल्याने खूप कमी लोक यासाठी रजिस्टर होतात.
आपला बोन मॅरोतील स्टेम सेल्स जगभरातल्या एखाद्या रुग्णासाठी अक्षरशः संजीवनी ठरू शकतात.
या स्टेम सेल्स देण्याची पद्धत अगदी निर्धोक आहे,शिवाय डोनर रजिस्ट्री त्यासाठी चांगला मोबदलाही देतात.
आपल्याकडे DATRI नावाची रजिस्ट्री आहे.त्यांच्या वेबसाईटवर गेल्यास सर्व माहिती मिळेल.

तिथे दाता म्हणून नोंद करणे अगदी सोपे आहे.आणि जर तुमचे स्टेम सेल्स कोणाशी मॅच झाले तरच दान करण्याची वेळ येऊ शकते.

 कित्येक छोटी  छोटी मुलं, तरुण तरुणी,खूप जबाबदाऱ्या शिरावर असणारे प्रौढ यांना रक्ताच्या कॅन्सरमुळे जीवाला मुकावे लागते.

इरफानला खरी श्रद्धांजली वाहायचीय?सोनाली बेंद्रे खूप आवडते?
युवराज सिंग लाडका आहे?
या सर्वांप्रति प्रेम दाखवण्याची संधी आहे.
 रक्ताच्या कॅन्सर रुग्णांसाठी बोन मॅरो दाता बनून....

इरफानला श्रद्धांजली वाहत असताना आपल्याला असा दाता बनून एखाद्या रक्ताच्या कॅन्सरच्या रुग्णाला जीवनदान देता येईल का असा विचार करूया.
Be a bone marrow donor.

                डॉ साधना पवार,पलूस.
               obgysadhana@gmail.com
.