नवनाथ मोरे

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मुख्यमंत्री मदतनिधीसाठी आवाहन केले जात आहे. या मदतनिधीच्या निमित्ताने देशातील एक कम्युनिस्ट आमदार त्यांच्या त्यागी वृत्तीने चर्चेत आले आहेत. त्यांच्या या वृत्तीला, देशसेवेला सलाम केला जात आहे.

हिमाचल प्रदेशात कट्टर प्रतिस्पर्धी भाजपची सत्ता असूनही त्यात राजकारण न आणता समाजसेवेसाठी, राज्यातील जनतेसाठी निस्वार्थी भावनेने कार्य कसे करावे, हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार राकेश सिंघा यांनी दाखवून दिले आहे. सिंघा यांनी त्यांचे एप्रिल ते डिसेंबर पर्यंतचे वेतनाचे धनादेशचे तेथील मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.  तर याधीच त्यांनी जानेवारी ते मार्च चे वेतन मुख्यमंत्री सहायता  निधीसाठी दिलेले आहे.

सिंघा हे हिमाचल प्रदेशमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांचे एकमेव आमदार आहेत. थिओग या विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. कोणतीही प्रसिद्धी न करता माकपचे नेते, आमदार, कार्यकर्ते म्हणजे त्यागी वृत्तीने कार्यरत राहणे, हे आज पुन्हा एकदा सिंघा यांच्यामुळे जगासमोर आले.

राकेश सिंघा यांनी कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या खर्चासाठी एप्रिल ते डिसेंबरपर्यंतचे त्यांचे वेतन दिले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एप्रिल ते डिसेंबर चे धनादेश त्यांनी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याकडे सुपुर्द केले.

राज्यातील जयराम ठाकूर सरकारने वेतनात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. थिओग विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले सिंघा यांनी जानेवारी आणि मार्चचे वेतन या आधीच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले आहे. सिंघा हे पहिले आमदार आहेत की ज्यांनी कोवीड-१९ पासून निपटण्यासाठी ११ महिन्याचे वेतन दिले आहे.

राकेश सिंघा म्हणाले की, “हा काळ सर्व वर्ग विशेष करून गरीब व मजुरांची मदत करण्याचा आहे. या काळात जी काही मदत केली जाईल ती कमी आहे. सरकारच्या वतीने राबविले जाणारे अभियान हे आदेशापुरते मर्यादित असल्याचे सिंघा यांनी म्हटले आहे. खेड्यांमध्ये स्वस्त रेशन उपलब्ध नाही, सरकारने याकडे गांभीर्याने घेतले पाहिजेत. थियोग विधानसभा मतदारसंघातील चार ग्रामपंचायतींनी भेट देऊन ग्रामपंचायत प्रतिनिधींकडून माहिती संकलित केली गेली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते दररोज खेड्यांना भेट देत आहेत. खेड्यांकडे विशेष लक्ष देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.