#काट्याचं_स्मारक
रोहीणी नवलेच्या वाचावा असा लेख
रावसाहेबांची नुसती धावपळ सुरू आहे. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. प्रचाराला सुरवात होऊन बराच कालावधी झाला आहे. तशी रावसाहेबांची मागील पाच वर्षांची सत्तेची कारकीर्द प्रचारकी थाटाचीच होती. सारं अगदी नियोजित असायचं, त्यांच्या प्रत्येक कृतीची बातमी व्हायची. जाहिरातींचा प्रचंड मारा, त्यात भाषणाच्या नाना कळा अवगत रावसाहेबांना, त्यामुळे जनमानसात आपली विकास पुरुष अशी प्रतिमा बांधणी करायला त्यांना काहीच अडचण आली नाही. किंबहुना सत्ताकाळाची पाच वर्षे याच कामी खर्ची घातली आणि त्यांच्या प्रतिमा बांधणीचं एकमेव काम त्यांनी लोकांसाठी समर्पित भावनेनं केलं. पण आता प्रचार अटीतटीचा होता, त्यांचे विरोधक एकत्र आले होते आक्रमक झाले होते. असे असले तरी कोणत्याही कारणे सत्तेची खुर्ची त्यांना आपल्या हातून जाऊ द्यायची नव्हती.
सारं काही दिमतीला आणि दावणीला बांधून आहेत रावसाहेब.प्रचार कार्यक्रमाच्या प्रत्येक दिवसाची, दिवसाच्या प्रत्येक मिनिटाची काटेकोर आखणी केलेली आहे. कुठं जायचं, काय करायचं, काय बोलायचं,अशा सगळ्याचं नियोजन तयार आहे. त्याला टिपेचा टीआरपी देण्यासाठी मिडियावाले दिवसरात्र एक करत आहेत. समाज माध्यमावर रोज नव्या प्रचार तंत्राचा अवलंब होतो आहे. गाठीभेटी, उद्घाटन, लोकार्पण, सभा अशा कार्यक्रमांना उधाण आलं आहे. सत्तेसाठी प्रचार आणि प्रचारासाठी वाटेल ते सुरु आहे. सगळं नियोजनाप्रमाणे सुरु आहे पण रावसाहेब अजूनही जरा चिंतातुर आहेत. प्रचार रंगात जरूर आला आहे पण लोकांच्या मेंदूची विचारशक्ती काबीज करण्यासाठी अजून ज्या एका वळणाची गरज आहे ते अजून प्रचारात घडत नाही, असं त्यांना वाटू लागलं आहे. तसं ते खासगीतल्यांना बोलून दाखवतात. झालं रावसाहेबांच्या तोंडातून शब्द पडायचा अवकाश नवीन नियोजनाला सुरवात झाली. पुढील नियोजनात काही बदल करण्यात आले. जिथे-जिथे रावसाहेबांचा दौरा होणार होता तेथील कार्यकर्त्यांना नव्या बदलाच्या सूचना धाडण्यात आल्या.
दुसऱ्या दिवसाची ही शेवटची सभा होती.पाच वर्षांच्या अवकाशाने रावसाहेब या भागात पुन्हा जाणार होते, दौरा सुरु झाला, गाड्यांचा ताफा रस्त्याने निघाला. रावसाहेबांच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले. लोकांची विचारशक्ती काबीज करण्याचा कट कसा घडवावा, काय करावं? रावसाहेब अशा विचारांत गडुन गेले होते. गाड्या अंतर कापत होत्या. नियोजित ठिकाण जवळ आलं आहे. रावसाहेबांच्या सचिवांनी त्यांना सांगितलं. रावसाहेबांनी डोक्यातील विचारांना बाजूला सारलं. सचिवांच्या बोलण्याकडे लक्ष देत ते खिडकीतून बाहेर पाहू लागले. मनाला ताजंवानं करणार काही नव्हतं खिडकीच्या बाहेरच्या जगात.तिथं होतं रखरखतं ऊन बाभळीची काळीकुट्ट झाडं आणि त्यांची छोटी हिरवी पानं हिरवाईचा आभास निर्माण करत होते नाहीतर साऱ्या रानात हिरवाईचा लवलेश नव्हता. खडकाळ, उधवस्त जमीन, मध्येच पिवळ्या,शुष्क गवताच्या माळाचे पट्टे आणि त्यावर पोटं खपाट गेलेली जनावरं ते खुरटं गवत हुंगत होती. हे सगळं पहात रावसाहेब पुढच्या भाषणात कशा- कशाच्या विकासावर बोलावे याचे मनोरे बांधत होते. रस्त्यांवरील खड्यांमुळे गाडीच्या वेगावर मर्यादा येत होती. तशी रावसाहेबांची चिंता आणि चिडचिड वाढत होती. त्यांचं खिडकीतून बाहेर पहात सचिवांच्या बोलण्याकडे लक्ष देणं चालूच होत. इतक्यात त्यांना खिडकीतून बाहेर जे दिसले ते पाहून त्यांचे डोळे लकाकले, डोक्यावरील भार क्षणात नाहीसा झाला, चेहऱ्यावरील चिंता उडून गेली आणि त्याजागी त्यांच्या चेहऱ्यावर धूर्त, कावेबाज भाव उमटले. गालातल्या गालात ते हसले स्वतःच्या अफलातून हुशारीवर ते खुश झाले. ड्राईव्हरला गाडी थांबायचा त्यांनी हुकूम सोडला, गाडी थांबली तशा मागच्या पुढच्या गाड्याही थांबल्या. सचिव त्यांच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागले. रावसाहेबांनी त्यांना खुणेनेच बाहेर पहायला लावले.
रस्त्याच्या कडेला भेगाळलेलं वावरं होते. त्याच्या बांधावर चारपाच बाभळी होत्या.कोपऱ्यावरील एका मोठ्या बाभळीखाली एक बैलजोडी बांधलेली होती. कावळे त्यांच्या पाठीवर गोचड्या खाण्यासाठी आल्यावर कावून बैल आपल्या शेपट्या हालवत सपासप पाठीवर मारत होते.वावराशेजारी असणाऱ्या खडकाळ माळावर अधेमधे असणारे वाळलेल्या गवतात पोट खपाटीला गेलेल्या चार गाया चरत होत्या. त्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या पाण्यावर माशा बसत आणि गोमाता जोरात मान हालवी.त्या चारही गाया अशक्त आणि कृश होत्या. त्या गोवंशाचे संगोपन करणारी बाई- म्हणजेच धोंडाबाई माळावरील एका बाभळीवर चढून बाभळीच्या वाळलेल्या फाट्या कोयत्याने तोडून खाली टाकत होती. कोयत्याच्या घावाने वाळलेल्या बाभळीच्या लाकडावर होणारा सपसप लयबद्ध आवाज त्या उदासीन शांततेचा भंग करत होता. मध्ये मध्येच धोंडाबाई खाली चरणाऱ्या आपल्या जनावरांकडे पाही, एखादी गाय चाऱ्याच्या शोधात लांब जात आहे असं वाटलं की धोंडाबाई बाभळीवरूनच जोरात काजळी, पवळी,सुमी अशी नाव घेऊन त्यांना साद घाली. धोंडाबाईला घाई झाली होती. चूल्हीकरता लाकडं तोडायची होती, अजून बैलांना चरायला सोडायचं होतं, जनावरं पाण्यावर न्यायची होती.ती आपल्याच विचारात मग्न होती. आपल्या शेतातून गेलेल्या रस्त्यावर कोणी सत्ताधारी थांबुन आहे याचं तिला भानही नव्हतं.
रावसाहेबांनी सचिवाला इशारा केला. इत्तर गाड्यांतील माणसांचा रावसाहेबांना गराडा पडला. बंधुकधारी साहेबांना कडे करून उभे राहिले. धोंडाबाईला बोलवण्यासाठी तिघेजण बाभळीकडे धावले. झाडाखाली अचानक आलेल्या त्या तिघांना पाहून धोंडाबाई घाबरल्या.
'ये बाई मंत्रीसाहेबांनी बोलवलयं, चल लवकर'. त्यातला एकजण.
धोंडाबाईला बोलायची संधी न देताच ते निघाले. ती सरसर झाडावरून उतरली आणि रस्त्याच्या दिशेने त्यांच्या माघं झपझप चालू लागली. तिची भीतीने पुरती गाळण उडाली होती, काय करावं,काय झालं असेल? तिच्या काळजात धडधड वाढली होती.ते तिघे पुढं आणि ती त्यांच्या माघं चालत निघाली.रावसाहेब अगदी काही अंतरावर उभे होते. सगळा घोळका धोंडाबाईकडे रोखून पहात होता.तिनं पदरांन चेहऱ्यावरचा घाम टिपला, पदर डोक्यावरून सावरून घेतला. घाईगडबडीत चालायच्या नादात तिच्या पायात एक बाभळीचा काटा टचकन टोचला. मघाशी झाडावर चढण्यासाठी तिनं चपला बाभळीखालीच काढून ठेवल्या होत्या, ती अनवाणीच चालत निघाली होती. त्या काट्याच्या वेदनेची कळ तिच्या संबंध अंगात भिनली.एक अस्पष्ट हुंकार तिच्यातोंडून नकळत बाहेर पडला.ती जागेवर थिजून उभी राहिली. ते पाहून रावसाहेब पुढे आले तसा त्यांच्या आजूबाजूचा मानवी गराडाही हलला.
धोंडाबाईने पायात रुतलेला काटा चिमटीत पकडून बाहेर काढला. रावसाहेब समोरच उभे होते, तो काटा ती फेकणार इतक्यात रावसाहेबांनी तो तत्परतेने आपल्या हातात घेतला.अर्धा काटा तिच्या पायातच मोडला होता. रावसाहेबांच्या हातातील मोडक्या काट्यावर रक्त माखले होते.त्यांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. काट्याला चिमटीत पकडून आपल्या डोळ्यासमोर धरत रावसाहेब उद्गारले.
'आई, तू असे काटे तुडवत अत्यंत प्रेमाने या गोवंशाचे संगोपन करते, कशाचीही अपेक्षा न करता. तुझे ऋण मला फेडता येणे शक्य नाही आई'!
धोंडाबाईला गहिवरून आले तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.रावसाहेबांनी आपला पांढरा शुभ्र रूमाल काढला.धोंडाबाईकडे पाहून ते म्हणाले,
'आई, तुझ्या पायात रुतलेला हा काटा मी जपून ठेविल. साऱ्या जगाला तुझी गोपालनावरची निष्ठा कळावी म्हणून मी पुन्हा निवडून आल्यावर या काट्याच जगातील सगळ्यात मोठं स्मारक उभारील'!
गराड्याने हे संपूर्ण नाट्य कॅमेऱ्यात कैद करने चालू केले होते. रावसाहेबांच्या आत्मीयता पूर्वक वागण्याने धोंडाबाईला काही सुचेना झालं होतं. रावसाहेबांनी तो मोडका काटा रुमालात गुंडाळून ठेवला, रुमालाला किंचित रक्त माखले.त्यांनी विचारपूस करायला सुरुवात केली.
आई, बैल झाडाला का बांधून ठेवले आहेत?
मालक बाहेरगावी बाजाराला गेलेत,बैल न गाई एकत्र चरत नाहीत, थोडी लाकडं तोडून झाल्यावर त्यांना सोडणारच होते चरायला साहेब, धोंडाबाई भीतभीतच बोलली.
'असू द्या,असू द्या आई,तुमच्या कष्टांची मला जान आहे.पण मी तुम्हाला वचन देतो, पुन्हा जर मी निवडून आलो तर हा तुमच्या पायात रुतलेला शेवटचा काटा ठरेल.सारं शेत मी काटामुक्त करेल. खरं सांगतो आई, तुमच्या ऋणाची जगाला आठवन रहावी म्हणून मी या काट्याचं जगातील सर्वात मोठं स्मारक बांधील'!
असं बोलून गोंधळलेल्या धोंडाबाईच्या पायावर रावसाहेब नतमस्तक झाले. गराड्याने टाळ्या वाजवल्या. रावसाहेबांनी तिचा निरोप घेतला आणि गाडीत बसले.गाड्यांचा ताफा धुराळा उडवत निघून गेला. धोंडबाई शुकशुकाट झालेल्या रस्त्याकडून शेताकडे वळली,तर काय, चार गाई चार दिशेला लांब निघून गेल्या होत्या. धोंडाबाई काजळी, पवळी, सुमी, भुरी अशा हाका देत त्यांना वळून आणायला लंघडत लंघडत पळू लागली.
इकडे ताफ्यातील गराड्याने सारं नाट्य व्हायरलं पण केलं तत्काळ. रावसाहेब कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचायच्या आधीच धोंडाबाईची गोष्ट लोकांच्या हातातील मोबाईलवर आली सुद्धा! रावसाहेब गाडीतून खाली उतरले, मंचावर त्यांचं आगमन होता क्षणी गर्दीने टाळ्यांच्या कडकडाटाची सलामी दिली.रावसाहेबांच्या चेहऱ्यावर विजयी हास्य पसरले. आता तो काटा जणू प्रचारातील स्टार प्रचारक बनला. धोंडाबाईच्या पायात मोडलेला काटा रावसाहेबांनी हातात घेणे सबंध प्रचाराला कलाटणी देणारी घटना ठरली. जिथे रावसाहेब प्रचाराला जात तिथे तो पांढऱ्या रुमालाच्या घडीतील काटा लोकांना दाखवत, लोक टाळ्या वाजवत.लोकांना त्या काट्याने त्यांच्या जीवनातील अडचणीचं विसरायला लावल्या. लोक दुष्काळ, महागाई, पाणी टंचाई, बेरोजगारी सारं विसरले. आता त्यांना खरोखरच काट्याचं स्मारक होणं हेच एक आपलं जीवितकार्य आहे असंच वाटू लागलं. इतकंच काय खुद्द धोंडाबाई आपल्या पायात मोडलेल्या काट्याचं शल्य विसरल्या. लोक धोंडाबाईला विसरले पण काटा बाकी लोकांच्या काळजात रुतून राहिला. फक्त कधीमधी धोंडाबाईला रावसाहेबांचं शेत काटामुक्त करण्याचं बोलणं आठवे, काटामुक्त शेत झालं तर बाभळीचा, बोरीचा, करवंदाच्या जाळीचा बिमोड होईल काय? भोळी धोंडाबाई काळजीत पडे, पण येड्या बाभळीच्या आभाळात खुपसलेल्या फांद्या पहिल्या की तिची ही काळजी भुर्रकन उडून जाई. जणू बाभळ तिला सांगे हा 'चुनावी जुमला' आहे नि मग धोंडाबाई आपल्या रोजच्याच जगण्या-मरण्याच्या प्रश्नांचा गुंता सोडवण्यात अडकून जाई.
..................
आता धोंडाबाईच्या पायात काटा मोडलेल्या जागी कुरूप झालं आहे.तशीही तिच्या पायात किती कुरूपं आहेत पण धोंडाबाईला हे ठाऊक नाही की मोडलेल्या काट्यांनीं होणारी कुरूपं वाढून-वाढून कुरूपांची माळ होणार आहे. सरपंच, आमदार, खासदार अशा प्रत्येकाच्या निवडणुकीत ही कुरुपं वाढतच जाणार आहेत. आधीच ढोरकष्टांनी भेगाळलेले तिचे पाय, अशा मोडलेल्या काट्यांच्या कुरूपांनी जायबंदी होत जातील आणि कुरूपांची माळ वाढतच राहील. त्यासोबत उन्मादी गुलालाचा मदमस्त धुराळाही नितळ आकाशाला डागाळतच राहील.
-रोहिणी नवले
भंडारदरा,(अहमदनगर)

0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji