गेल्या वीस वर्षात आज पहिलाच  असा दिवस गेला की ,ना मी घराच्या परिसराबाहेर पडलो, ना कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणाला भेटलो किंवा बोललो. आज माझी दिनचर्या पंचवीस वर्षांपुर्वी होती तशीच होती, जनता कर्फ्यु पुकारल्यामूळं मी ठरवलं होतं आज कोणालाही भेटायचं नाही, फोन टाळायचा आणि आजचा दिवस माझ्या आतमध्ये लपुन बसलेल्या शेतक-यालाच द्यायचं म्हणून आज सकाळी मॉर्निंग वॉक टाळला आणि अंघोळ करून सगळं शिवार पालत घातल, उन्हाळा संपत आला ...विहीर दुरुस्त करून घ्यायचं,नांगरून ऊन खात पडलेल्या शेतात शेणखत टाकून घ्यायचं, मी शेतात फिरत असताना सोबत मुलगा सौरभ आणि पुतण्या वैभव ही माझी सर्जा राजाची जोडी होतीच. त्यांना म्हटलं लेकाहो आता मोठे झालात ,आता जरा शेतात लक्ष घाला. जुलै महिन्याआधी हिरवळीची खतं रानात गाढून घ्यायची आहेत त्याची तयारी करा अशा बऱ्याचशा सूचना देऊन साडे नऊच्या दरम्यान शेतातुन घरी आलो. चहा नाश्ता केला आणि तराट गोठ्यात शिरलो, हातात खराटा घेऊन स्वच्छपैकी गोठा धुवून घेतला. गाय-म्हैस आणि दोन वासरांना थंडगार पाण्याने धुवून घेतलं, गोठ्यातील मुकी जनावरं बऱ्याच दिवसांनी मी गोठ्यात गेल्यामुळे खुश झाली होती, माझ्याअंगाला त्यांचं अंग घासत होती, शेपटीचा फटका देत होती आणि त्यांच्या खरबरीत जिभेने अंगाला चाटत होती, त्यांच्या चिभेचा स्पर्श झाल्यावर अंगाला शहारे येत होते, कोण कुठला तो चीन ,कुठला तो कोरोना त्यामुळं मला आज गेल्या कित्येक वर्षांमध्ये हरवलेला आनंद मिळत होता. गाईच्या अंगावर हात फिरवताना तिच्या गळ्याखाली तिला असलेल्या पोळ्यामध्ये बेमालुमपणे लपून बसलेल्या गोचडीला चिमटीत पकडून तिला पायाखाली चिरडले तेव्हा गाईच्या नजरेमध्ये कृतज्ञतेचे भाव होते, ते व्यक्त करण्यासाठी ती माझं अंग चाटत होती, गाई-म्हशींची अंघोळ झाली होती... आता म्हंटल ऊन डोक्यावर आलय पाण्यात खेळायची लहर आली म्हणुन तसचं ब-याच दिवसापासून शेताला पाणी दिले नव्हतं, मग हातात खोरं घेतलं आणि चिखल तुडवत, सूर्य डोक्यावर तळपत असताना हिरव्यागार शेताला थंडगार पाणी देत, चिखलाने अंग माखूण घेत भरदुपारी हुंदडत राहिलो, सौरभ सोबत पाईप जोडणे, पाठ फोडणे, पाणी धरणे यात कधी सूर्य कलतीला गेला कळालचं नाही, मग लक्षात आलं की अजुन जेवलोच नाही म्हणुन पाठाच्या पाण्याने हात-पाय धुवून चुळ भरुन जेवायला गेलो, आणि आज रोजपेक्षा जरा जास्तच जेवलो त्यानंतर थोडं आराम केला आणि मग पुस्तकात रमलो. यात संध्याकाळ कधी झालेलं  कळालचं नाही. लोक गोळाकरुन थाळी वाजवण्याचा प्रकार फक्त लहानपणी पाखरं राखण्यासाठी करायचो, आता स्टंट म्हणुन तो प्रकार न केल्याचं समाधान मला वाटतं. तरी कोरोनाच्या निमीत्ताने का असेना पण आजचा दिवस माझा आधीच्या आठवणीत रमला.