२१ व २२ मार्च १९२०-२०२० शताब्दी महोत्सव वर्ष माणगांव परिषद 
माणगाव परिषद : बाबासाहेबांच्या कार्याचा प्रारंभबिंदू
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय, वैचरिक, संघटनात्मक अशा सर्व प्रकारच्या दैदिप्यमान वाटचालीत वयाच्या ऐन तिशीत त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकराजा राजर्षी शाहू प्रमुख पाहुणे असलेल्या ‘माणगाव ‘ परिषदेचे महत्व मोठे आहे. २१ व २२ मार्च १९२० रोजी झालेल्या या परिषदेचे शताब्दी वर्ष सुरू झाले आहे.
कोल्हापूर संस्थानातील “माणगाव”, येथे २१ व २२ मार्च १९२० रोजी अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाची परिषद झाली. त्यापरिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते तर, प्रमुख पाहुणे राजर्षी शाहू महाराज होते. वयाच्या ऐन तिशीत या परिषदेचे अध्यक्ष असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या पुढील व्यापक कार्याचा ही परिषद अनेक अर्थानी प्रारंभबिंदू ठरली. १४ एप्रिल १८९१ रोजी जन्मलेल्या बाबासाहेबांनी सातारा, मुंबई येथे शिक्षण घेतले. पुढे १९१३ साली ते बडोदे संस्थांनाच्या शिष्यवृत्तीवर अमेरिकेला गेले. तेथे कोलंबिया विद्यापीठात त्यांनी ‘अर्थशास्त्र’ विषयात एम.ए. आणइ पी.एच डी’ केले. तेथून परतल्यावर बडोदे संस्थानात ते नोकरीवर रुजू झाले. पण, या महापंडितालाही अस्पृश्य म्हणून अतिशय कटू अनुभव आले. परिणामी त्यांनी बडोदे संस्थानातील नोकरी सोडून देऊन मुंबईला सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली.
आपण एवढे शिकलेसवरलेले असूनही ‘अस्पृश्य’ म्हणून होणारी मानहानी त्यांना अस्वस्थ करू लागली. तसेच आपल्यासारख्या विलायतेतून उच्च विद्याविभूषित झालेल्याला जर, अशी वागणूक मिळते तर, आपल्या समाजातील सर्वसामान्य माणसांना किती यातना सहन कराव्या लागत असतील? हा प्रश्न त्यांना छळू लागला. त्यातूनच त्यांनी अस्पृश्यांमध्ये जागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांची संघटना उभारली. ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक ‘नावाचे पाक्षिक सुरू केले. लगेच २१ व २२ मार्च १९२० रोजी ‘माणगाव’ येथे अस्पृश्यांची परिषद घेतली. तर, नागपूरला राजर्षी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय परिषदही घेतली. बाबासाहेबांच्या पुढील जीवनातील दैदिप्यमान सामाजिक, राजकीय, वैचारिक, संघटनात्मक वाटचालीत ‘माणगाव’ परिषदेचे महत्व मोठे आहे. त्या परिषदेचे शताब्दीवर्ष सुरू झाले आहे. म्हणूनच त्याचे औचित्य साधून त्या परिषदेतील डॉ. आंबेडकर व लोकराजा शाहू यांचे विचार समजून घेण्याची गरज आहे. कारण त्या विचारांचा समकालीन संदर्भही मोठा आहे. २१ मार्च रोजी ही परिषद सुरू झाली तो पाडव्याच्या दिवस होता की
जवळजवळ पाच हजारांवर लोक त्यात सहभागी झाले होते. या सभेला लोकांनी जाऊ नये म्हणूनही पद्धतशीर प्रयत्न केले गेले होते. पण, तरीही हजारो लोक जमले. संध्याकाळी पाच वाजता परिषद सुरू झाली. स्वागताध्यक्ष दादासाहेब इनामदार यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. त्यातून परिषदेचा हेतू स्पष्ट केला आणि इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपला उद्धार आपणच केला पाहिजे असे सूतोवाचही केले.
या परिषदेच्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत समाजाला एक नवी दिशा दिली, अशा पद्धतीची ही पहिलीच परिषद असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, ‘आपल्या उन्नतीबाबतची कळकळ आणि बहिष्कृत वर्गात सुरू असलेली विचारक्रांती ही अपूर्व आहे. अपल्यावर ओढवलेली दुरवस्था ईश्वरी लिलेचा परिपाक नसून, तो इतरांच्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे. जन्मसिद्ध योग्ययोग्यता आणि जन्मसिद्ध पवित्रअपवित्रता या दोन तत्वांनुरूप हिंदू लोकांची विभागणी केली तर, त्याचे तीन वर्ग होतात. (१) जन्माने सर्वात श्रेष्ठ व पवित्र ज्याला आपण ब्राह्मणवर्ग असे म्हणतो. (२) ज्यांची जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रता ब्राहमणापेक्षा कमी दर्जाची आहे असा ब्राह्मणेतर वर्ग आणि (३) जो जन्मसिद्ध कनिष्ठ व अपवित्र आहे असा बहिष्कृत वर्ग होय.’
या भाषणात डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केले की, या त्रिस्तरीय विभागणीने गुणहीन ब्राह्मणांचेही कल्याण झाले. ब्राह्मणेतरांना विद्या व संपत्ती मिळवण्याचे मार्ग मोकळे आहेत. पण, आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्मसिद्ध अयोग्यता व अपवित्रता यामुळे फारच शोचनीय झाली आहे. व्यापार, नोकरी आणि शेती हे धनसंच याचे मार्गच त्यांना मोकळे नाहीत. आपल्या वर्गाकडे नैसर्गिक गुणांची अजिबात कमतरता नाही. पण, परिस्थिती अनुकूल नाही. म्हणूनच आपले राजकीय सामर्थ्य वाढविले पाहिजे. ‘सत्यमेव जयते’हे तत्व पोकळ आहे.सत्याचा जय व्हायचा असेल तर आपण आपली चळवळ बळकट केली पाहिजे.
या परिषदेचे प्रमुख पाहुणे राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ.आंबेडकरांचा ‘पंडित’ आणि ‘विद्वानांचे भूषण ‘असा गौरवपूर्ण उल्लेख करून अस्पृश्याना ‘आपल्या जातीचा पुढारी करा’असे आवाहनही केले. तसेच त्यांनी आपल्या करवीर संस्थानात अस्पृश्यांवर अन्याय करणारी हजेरीची पद्धत का नष्ट केली हेही सांगितले. तसेच वेठबिगारी पद्धतीही नष्ट करण्याचा मनोदय व्यक्त केला. अस्पृश्य वर्गाकरता आपण केलेले प्रयत्न बाबुराव यादव यांनी पुस्तिकेद्वारे नोंदवून ठेवल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.
माणगाव परिषदेतील भाषणात राजर्षी शाहू महाराज म्हणतात, ‘आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेत पोचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी निवडत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळवण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही अप्पलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवतात. आता तुम्ही डॉ. आंबेडकर यांना आपला पुढारी निवडलेत ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. अस्पृशांना माणसाप्रमाणे वागविल्या शिवाय राजकारण करताच येणार नाही.’
या परिषदेच्या अखेरच्या सत्रात महायुद्ध विषयक भूमिका,राजर्षिनी अस्पृश्य समाजाच्या उन्नतीचे कार्य केल्यामुळे त्यांचा वाढदिवस सणासारखा साजरा करणे, बहिष्कृतांच्या साठी झटणाऱ्या संस्थांनिकांचे आभार, अस्पृश्य समाजाला नागरिक म्हणून मानवीहक्क समतेच्या तत्वावर मिळावेत,प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असावे, स्पृश्य-अस्पृश्य यांच्या शाळा एकत्र असाव्यात, मेलेल्या जनावरांचे मांस न खाणे,ही परिषद भरविण्यात महत्वाचे सहकार्य करणाऱ्या आप्पा दादगौडा पाटील यांचे आभार अशा स्वरूपाचे पंधरा ठराव मंजूर करण्यात आले.
आज शंभर वर्षानंतर सामाजिक परिस्थितीत थोडाफार फरक झाला असला तरी माणगाव परिषदेतील डॉ.आंबेडकर व राजर्षी शाहू यांच्या भाषणातील गाभाघटक आपणास विचारात घ्यावाच लागेल.एकीकडे धर्मावर आधारित राष्ट्रनिर्मितीचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत.दुसरीकडे परधर्मद्वेष वाढविला जात आहे. जगण्याच्या मूलभूत प्रश्नांपेक्षा सांस्कृतिक राष्ट्रवादाचे ढोल बडविले जात आहेत. अस्पृश्य समाजातील पुढाऱ्यांना धर्मांध पक्ष लालूच दाखवीत आहेत. तसेच काही भणंग पुढारीही आपली सोय झाली म्हणजे आम समाजाची सोय झाली अशी सोयीची समीकरणे मांडत आहेत.(माणगाव परिषदेत राजर्षिनी ‘अप्पलपोटे’ज्यांना म्हटले ती हीच मंडळी). या सर्व पार्श्वभूमीवर ‘माणगाव’परिषदेला केवळ शताब्दी साजरी करायची एक घटना म्हणून नव्हे तर, समकालीन संदर्भात आपले अस्तित्व तपासून पाहायला लावणारी घटना म्हणून पाहिले पाहिजे.
डॉ. बाबासाहेबांनी या परिषदेनंतर डी.एस्सी,बॅरिस्टर या पदव्या मिळवल्या.’ बहिष्कृत हितकरिणी’ संस्था काढली. महाडचा सत्याग्रह केला. मनुस्मृती जाळली. काळाराम मंदिर सत्याग्रह केला. व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात मजुरमंत्री झाले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री झाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. बौद्ध धम्म स्वीकारला हा सारा इतिहास आपण जाणतो. पण, या साऱ्या दैदिप्यमान वाटचालीचा प्रारंभबिंदू म्हणून ‘माणगाव ‘परिषदेचे महत्व निश्चितच फार मोठे आहे. ही परिषद बाबासाहेबांचे नेतृत्व, कर्तृत्व आणि दलितोद्धाराचे कार्य याचा पाया होती. म्हणूनही तिच्या शताब्दीचे महत्व मोठे आहे.
(लेखक समाजवादी प्रबोधिनीच्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकाचे ‘संपादक’आहेत.)