अग ! झाला का डबा ! दे लवकर जनता कर्फ्यु बंदोबस्त फिक्स पॉईंट ड्यूटीवर लवकर पोहोचायचं मला...चार पोळ्या भाजी करायला इतका उशीर ? तासाभरा पासुन देते देते म्हणुन नुसतेच म्हणतेस..अजुन डबा झाला नाही ? नसलं होतं तर तसं सांग ! जातो मी तसाच ! 

अहो ! चिडु नका ! आलेच मी ! एकचं पोळी राहिलंय ती लाटते आणि डबा भरायला घेते ! भाजी आधिच झालीय ! 

तुम्हां बायकांचं ना ? कांहींच समजत नाही ! जे सांगितलं ते करायच्या ऐवजी भलतंच कांही करत बसणार ! मला माहितिये डबा करायचं सोडुन तू धुणी भांडी करीत बसली असणार ! तरी सकाळी ड्यूटीवर लवकर जायचं म्हणुन रात्रीचं बजावून सांगितलं होतं...

नाही हो ! पहाटेच उठलेय ! बाकी कशालाच हात लावला नाहीये मी ! तुम्हाला चहा करून दिला मला गाळून घेतला ! तो सुध्दा  तसाच पडलाय कपात अजुन !  
हा घ्या ! भरून दिलाय तुमचा डबा ! 

अग हे काय ! किती दिवसाचा किती माणसांचा डबा दिलाय हा ? चारपाच जण जेवतील इतकं जेवण दिलं कि काय ? मी काय एव्हढं खाणार ? 

नायी ओ ! तुमच्या बरोबर आणखी तिघा चौघांना पुरेल इतकं जेवण दिलंय बस ! आता ड्यूटी ठिकाणी सोबत असणाऱ्या  तुमच्या इतर जोडीदारा पैकी कोणी आणला असलं डबा कोणाला कांही कारणाने नसलं जमलं आणायला मग ते काय उपाशी राहतील ? आणि फिक्स पॉईंटवर कुठलं हॉटेल मिळणार उघडं ? म्हणुन थोडा जास्त दिला डबा..उपाशी राहण्या पेक्षा..वेळ मिळेल तसा दोन दोन घास खा सगळे मिळून ! पाण्याची बॉटल पण दिलीय मोठी....

खाकी वर्दीधारी तो..बायकोकडे भरल्या डोळ्यानी पहात होता...त्यानं बाईकला डब्याची बॅग पाण्याची बाटली व्यवस्थित अडकवली..दारात उभ्या बायकोला बाय बाय केला...स्वतः  घरी कधी परतणार हे त्यालाही माहीत नव्हतं आणि त्याच्या बायकोलाही नाही...हा!  मात्र कोपऱ्यावर वळता वळता तो मनाशीच पुटपुटला...ह्या बायकांचं कांहीच समजत नाही! 
पण यावेळी चेहेऱ्यावरचे भाव थोड्या वेळा पुर्वी दिसणाऱ्या त्रासलेल्या भावा पेक्षा मात्र खूपच वेगळे होते......
😔😔😔😔😔😔😔😔