बचत...ग्रामीण भागातील श्रमिक महिलांची "*पूजा कांबळे.

"बचत...ग्रामीण भागातील श्रमिक महिलांची "*
पूजा कांबळे.
आजच्या दै लोकमत मधील जागतिक महिला दिनानिमित्त प्रकाशित झालेला लेख.
जीवनसाथी पूजाने तिच्या भोवताली असणाऱ्या श्रमिक, कष्टकरी महिलांच्या बचतीच्या अनुषंगाने लिहलेला लेख.
"बचत...ग्रामीण भागातील श्रमिक महिलांची "*
      कोण? पोस्टमन मॅडम का ? हो मीच . आम्हाला बी पोस्टाच पुस्तक काढायचं आहे हो . काय -  काय लागतय त्याला ? आधारकार्ड , रेशनकार्डची झेरॉक्स आणि फोटो . एवढच का? हो एवढच. बरं मंग मी उद्या येते सकाळी कागद घेऊन . आता मी कामाला चाले. तुम्ही किती वाजता येता ? मी सकाळी ९ नंतर असते. बरं मग द्या तेवढ काढून आमचं पुस्तक आव. रोजचं कामाला जाताव बघा, आलेला पैसा असाच खर्च व्हतो घरात. माग टाकले तर तेच चार - दोन रुपये उद्या उपेगला पडतील. त्याला व्याज - बीज काही भेटत असल की, हो भेटतं ना . उद्या या सांगते तुम्हाला व्यवस्थित . आव आज काल कशाला पैसा लागत नाही , लय महागाई वाढली . येते मग मी उद्या , होईल ना काम . काही अडचण नाही की येणार? काही अडचण येणार नाही. पोस्टातला पैसा बुडत नाही. व्हय की . येते मग मी . हा असा नेहमीचा संवाद ठरलेला ( काहीसा बदल नक्कीच ) 
         रोज गावात पत्र वाटणे, पैसे जमा करणे, नवीन खाते उघडणे ही काम करत असल्याने गावातील लोकांशी माझा जिवंत संपर्क येतो. ग्रामीण जीवन , त्यांची राहणी जवळून पाहायला , अनुभवायला भेटते. क्वचितच एखादा दिवस असा असेल की, त्यादिवशी चहाचा आग्रह झाला नाही. असो, कुसळंब या बार्शी शहरापासून जवळच असलेल्या या गावातील पोस्ट ऑफिस मध्ये मी काम करते. कुसलंब , धानोरा , वानेवाडी ही तीन गावे या पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत येतात. आज महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या क्षेत्रात मी काम करत असताना माझ्या संपर्कात येणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांचं जीवन मांडण्याचा माझा छोटा प्रयत्न .
   तस पाहायला गेलं तर ग्रामीण भागातील महिला या अंगमेहनत करणाऱ्या कष्टकरी महिला. गावाकडे महिलांचा प्रमुख रोजगार म्हणजे दुसऱ्यांच्या शेतात मजुरीने कामाला जाणे.सकाळी लवकर उठून घरातील सगळी काम करून ९ /९:३० ला तर या कामाला निघतात. सकापासून ते संध्याकाळी ६ पर्यंत राबून सुद्धा मजुरीतून मिळणार उत्पन्न अत्यल्पच, परंतु आजच्या या महागाईत पण नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन संसाराचा गाडा पुढे घेऊन जात असतात. त्यातूनच महिन्याला हजार -  पाचशे रुपये बाजूला काढून आपल्या भविष्यासाठी किंवा अडी - नडी साठी बचत करतात. 
        आमच्या लोखंडे मावशी, अशिक्षितच परंतु प्रचंड कष्ट करणारी कणखर स्त्री. मला आठवत तस या मावशींनी कधीही पैसे भरण्यात खाडे केल्याचे मला आठवत नाही. प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेनंतर पैसे भरण्यासाठी अतिशय आतुरतेने त्या माझी वाट पाहत असतात. दोघी सासू - सूनांची ही चोटीच बचत , पण त्यांची ती बचत त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आधार देणारी ठरते.सारिका ताई अल्पशिक्षित परंतु बचतीची महत्व जाणणारी दूरदृष्टी असणारी स्त्री स्वतः तर बचत करतेच परंतु इतरांनाही बाचतीच महत्व पटवून देते व प्रोत्साहन देते. एवढच नव्हे तर सकाळी कामाला लवकर जाणाऱ्या महिलांची आणि माझी भेट होतं नसल्याने या सारिका ताई स्वतःजवळ त्यांची पासबुक आणि पैसे ठेऊन घेत आणि माझ्याकडे जमा करत. गावात खाते उघडण्यासाठी मला नेहमीच  त्यांची मदत होते. आमच्या गरडदे मावशी ( प्रेमाने आम्ही त्यांना सीताफळे बाई म्हणतो) सीताफळाची प्रचंड मोठी बाग त्यांच्याकडे आहे. शेती मोठी , शेतीतून मिळणार उत्पन्नहि मोठं परंतु तेवढाच साधेपणा आणि माणुसकीहि ती जपते. आपलीही स्वतःची स्वतंत्र बचत असावी असं तिला वाटतं आणि तीही आपली छोटीशी बचत करायला सुरुवात करते. अंगणवाडीमधल्या बाई, अंगणवाडी सेविका , आशा ताई यांनाही मिळणार उत्पन्न अत्यल्पच पण त्यातूनही त्या आपली महिन्याची बचत करतात. 
         या सर्व श्रमणाऱ्या कष्टकरी ग्रामीण भागातील महिला . यांच्या सारख्या असंख्य महिला आहेत ज्या छोटीशी बचत करतात. कोणाची बचत ही आपल्या संसारासाठी तर कोणी आपल्या मुला - बाळांच्या शिक्षणासाठी बचत करत. कधी आजारी पडलोच तर जवळ पैसा असावा म्हणून तर म्हातारपणासाठि काहीजणी बचत करतात.नवरा दारू पिऊन सगळा पैसा उडवतो म्हणून नवऱ्याला न सांगता बचत करणाऱ्या पण अनेक महिला आहेत. प्रत्येकीचा आपल्या बचती मागचा उद्देश वेगवेगळा. आपल्या कुटुंबव्यवस्थेच्या आर्थिक नाड्या या सहसा पुरुषांच्याच हातात असतात. सर्व आर्थिक व्यवहार करणे - ठेवणे ही पुरुषांचीच जबाबदारी आहे असं समजल जात. म्हणून आर्थिक व्यवहार करण , लागणारी कागदपत्र जमा करणे - देणे या छोट्या - छोट्या गोष्टीसुद्धा महिलांना अवघड वाटतात. त्यातही हिंमत करून किंवा एकमेकींच्या नादाने का होईना त्या येतात. आपल्या         ' बचतीसाठी' . शहरीभागात लोकांकडे बचतीसाठी अनेक पर्याय आहेत. मोठमोठ्या आर्थिक उलाढाली तेथे चालतात. परंतु महिन्याला हजार - पाचाशेची बचत करणाऱ्या या महिलांना मात्र रोज शहरात जाणं परवडणार नसत आणि वेळही नसतो. म्हणून गावातच आपल्या घराजवळ असणाऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये त्या आपली बचत करतात. 
         एकेदिवशी रात्री सहज बाहेर फिरत असताना गावातील एक मावशी मला भेटल्या. म्हणल एवढ्या रात्री इकडे कुठे? रात्रीचे १० वाजत आहेत. हे काय ही रस्त्याची काम आम्हीच करतोय. सकाळी १० वाजल्यापासून काम करतोय. तुम्ही कितीजण आहात? १०- १५ जणी आहोत. गावातल्याच आहेत सगळ्या.किती वेळ काम करायचं आणखी ? रात्री १२ - १ वाजतील. अरे बापरे ! एवढा वेळ? हो. पुढे मला काय बोलावं काहीच सुचलं नाही. कारण ज्यांच्या गावाला गेल्या अनेक वर्षांपासून ( स्वातंत्र्या पासून म्हणतात) रस्ताच नाही. त्यामुळे गावात बस सुद्धा जात नाही. अशा डोंगराळ भागात वसलेल्या गावातील या महिला शहरातील सर्व रस्ते करण्याची काम करत होत्या. बाकीच्या महिलांना भेटून , थोडंसं फिरून मी घरी आले. आणि डोळ्यासमोर तेच चित्र फिरू लागलं. काही केल्या या महिला डोळ्यांसमोरून जात नव्हत्या. वाटल की, महिला दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या , नाव मिळविणाऱ्या महिलांचा सन्मान , सत्कार सोहळा नेहमी होतोच .( झाला देखील पाहिजे ) परंतु या श्रमनाऱ्या , अंगमेहनत करणाऱ्या कष्टकरी महिलांचा देखील सन्मान व्हायला हवा. आपल्या समोरील अडचणींचा हिंमतीने सामना करणाऱ्या, कश करणाऱ्या महिलांच्या संघर्षावर , जीवनावर देखील बोलायला हव. रात्री कामासाठी आपल्या घरापासून - गावापासून  दूर आलेल्या महिलांना असुरक्षित वाटल नसेल का? भीती वाटली नसेल का? वाटली असेलना पण तरीही त्या आल्या कारण त्यांच्या डोळ्यासमोर उभं होतं ते त्यांचं कुटुंब आणि डोक्यात विचार होता तो पोटाच्या भुकेचा....
    या महिला दिनानिमित्त याचं जगण्यासाठी राबणाऱ्या महिलांचं जगणं शब्दात मांडण्याचा माझा हा प्रयत्न....
       पूजा कांबळे- सोलापूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या