आशा कर्मचाऱ्यांना दिलेली मानधन वाढ तुटपुंजी !आशांना किमान 10 हजार रुपये वेतन द्या. कॉ डॉ अजित नवले

आशा कर्मचाऱ्यांना दिलेली मानधन वाढ तुटपुंजी !

आशांना किमान 10 हजार रुपये  वेतन द्या.

.....सिटू संलग्न आशा कर्मचारी संघटनेची मागणी



आशा कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची केलेली तयारी पाहून राज्य सरकारने आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात किरकोळ वाढ केली. मात्र आशा कर्मचाऱ्यांवर टाकलेले कामाचे स्वरूप पाहता दिलेली ही वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याने आशा कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष खदखदतो  आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या आशांना किमान 10 हजार रुपये मासिक वेतन, कोरोना साथीच्या सर्वेचा प्रतिदिन किमान 300 रुपये मोबदला द्यावा व  गट प्रवर्तकांना 25 हजार रुपये वेतन द्या अशी मागणी सिटू संलग्न आशा कर्मचारी संघटनेने केली आहे. 

आशा कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी फेडरेशनच्या झेंड्याखाली एकत्र येत राज्यव्यापी संपाचा इशारा दिला होता. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आशा देत असलेले योगदान पाहता हा संप राज्य सरकारला परवडण्यासारखा नव्हता. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर
 25 जून रोजी  आशांच्या मानधनात 2000 रुपये व गट प्रवर्तकांच्या मानधनात 3000 रुपये वाढ  करण्याचा निर्णय घेतला. सदरच्या निर्णयाची अंमलबजावणी 1 जुलै 2020 पासून  सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे आशांचे एकूण मानधन   3500 झाले. गट प्रवर्तकांचे एकूण मासिक मानधन 11,500 रुपये झाले. मात्र आशा व गटप्रवर्तकांचे कामाचे स्वरूप पाहता हे मानधन अत्यंत अन्यायकारक आहे. आशांना यानुसार प्रतिदिन केवळ 116 रुपये मानधन मिळत आहे. 

गट प्रवर्तकांना महिन्याला नवीन वाढीनुसार 11,500 रुपये मोबदला मिळणार आहे. मात्र या मोबदल्यात गट प्रवर्तकांनी 20 गावांना भेटी देण्याचा खर्च करायचा आहे. हा खर्च वजा केला तर खूपच कमी रक्कम गट प्रवर्तकांना शिल्लक राहत आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आशा व गट प्रवर्तकांच्या मानधनात आणखी वाढ करावी. आशांना किमान 10,000 रुपये व गट प्रवर्तकांना किमान 25,000 रुपये मानधन द्यावे. तसेच कोरोना सर्वेचा मोबदला म्हणून आशांना प्रतिदिन 300 रुपये द्यावेत अशी मागणी सिटू कामगार संघटनेचे मेहबूब सय्यद, सदाशिव साबळे, एकनाथ मेंगाळ, यांनी केली आहे. किसान सभेने मागणीला पाठींबा जाहीर केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या