आशा व अर्धवेळ परीचरांचे प्रश्न सोडविण्यास अग्रक्रम द्यावा.
.... सिटू कामगार संघटनेची मागणी
अकोले:-आरोग्य क्षेत्रात अत्यंत तळमळीने काम करणाऱ्या आशा कर्मचारी, गट प्रवर्तक व अर्धवेळ परीचरांचे प्रश्न सोडविण्यास अग्रक्रम द्यावा अशी मागणी आज सिटू कामगार संघटनेच्या वतीने आ. डॉ. किरण लहमटे यांच्या मार्फत सरकारकडे करण्यात आली.
आशा कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या फेडरेशनने आशा व गट प्रवर्तकांच्या मागण्यांसाठी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्याची हाक दिली होती. मात्र राज्य सरकारने आंदोलन करण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत आशांना प्रति महा 2000 रुपये व गट प्रवर्तकांना 3000 रुपये वाढीव मोबदला देण्याची घोषणा केली. सिटू कामगार संघटनेने सरकारच्या या घोषणेचे स्वागत केले. मात्र या व्यतिरिक्त प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत संघर्ष सुरूच ठेवला आहे. अकोले येथे संघटनेच्या वतीने आ. डॉ. किरण लहमटे यांना निवेदन देऊन उर्वरित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
सरकारने आशा व गट प्रवर्तकांच्या कामाच्या मोबदल्यात वाढ केली असली तरी किमान वेतन कायद्याच्या निकषांशी तुलना करता ही वाढ नक्कीच कमी आहे. आशा कर्मचारी कुशल कामगार असल्यामुळे त्यांना किमान वेतन कायद्यानुसार 18 हजार रुपये व गट प्रवर्तकांना किमान 25 हजार रुपये वेतन देणे आवश्यक आहे.
अर्धवेळ परीचरांची नियुक्ती जरी अर्धवेळ स्वरूपाची असली तरी त्या पूर्णवेळ काम करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांनाही किमान 18 हजार रुपये किमान वेतन लागू होणे अपेक्षित आहे. सिटू कामगार संघटना यासाठी सातत्याने संघर्ष करत आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या मागण्या सोडविण्यासाठी आमदार या नात्याने सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी डॉ किरण लहमटे यांनी दिले.
कामगारांच्या प्रश्नांसाठी आवश्यकता पडल्यास पुन्हा राज्यव्यापी आंदोलनाचे हत्यार उचलू असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला. डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, तुळशीराम कातोरे, भारती गायकवाड, सविता काळे आदींनी यावेळी कामगारांचे प्रश्न मांडले. तालुक्यातील आशा, गट प्रवर्तक व अर्धवेळ परिचर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji