सोलापूर दि.०३/०३/२०२०
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदूंच्या खांद्याला खांदा लावून मुस्लिम समाज लढला.सध्याचे सरकार हे संविधानविरोधी नागरिकत्व संशोधनासारखे कायदे जनतेवर लादून हिंदू मुस्लिम जनतेला विभक्त करु पहात आहे.परंतु देशाची जनता भाजपचा मनसुबा कदापि यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही जन्मलो या मातीत आणि मरणारही इथेच.आम्हाला कोणतीही शक्ती या देशापासून विभक्त करू शकणार नाही. असे परखड मत सिटूचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव कॉ.एम एच शेख यांनी व्यक्त केले.
संविधान बचाव कृती समितीच्या वतीने सी ए ए ,एन आर सी ,एन पी आरच्या विरोधात अखंडपणे सुरु असलेल्या धरणे आंदोलनात ते बोलत होते.याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या .पुढे बोलताना ते म्हणाले,देश पारतंत्र्यात असताना सर्वात प्रथम मुस्लिमांनी स्वातंत्र्यासाठी आवाज उठविला.अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे ९० टक्के मुस्लिम उलेमा होते.त्यांनी सारं आयुष्य कारावासात काढलं पण माफीनामा लिहून देऊन इंग्रजांसमोर शरणागती पत्करली नाही.असा वारसा असणार्या मुस्लिमांना सरकार नागरिकत्व सिद्ध करण्याची भाषा करते हे या देशाचं दुर्दैव आहे.हिंदू मुस्लिम ऐक्याचे आनेक दाखले देत देशाला तडा जाता कामा नये असा इशारा त्यांनी यावेळी दिला.अब्दुल हमीद,सुभाषचंद्र बोस,शाहनवाज,अबुल कलाम,भगतसिंग,अशफाक,चंद्रशेखर आजाद यांचे बलिदान व योगदान म्हणजे या देशाच्या ऐक्याचं प्रतिक आहे असंही ते म्हणाले.मुस्लिमांची संख्या वाढत आहे.त्यांची लोकसंख्या वाढल्यास हिंदूंच्या रोजगारावर गदा येईल असा भ्रम पसरवून दोन समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे. एनपीआर,सीएए,एनआरसी सारखे कायदे आणून हिंदू राष्ट्र निर्मितीचे भाजपाचे स्वप्न संविधानप्रेमी जनता कदापि पूर्ण होऊ देणार नाही असा विश्वासही कॉ.शेख यांनी व्यक्त केला.
राष्ट्रगीताने आजच्या धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली.यावेळी महिला व पुरुषांची मोठी गर्दी होती.
0 टिप्पण्या
please do not enter any spam link in the comment box.
Emoji