प्रेम भावना आहे, गरज आहे,सवय आहे, त्याग आहे, विश्वास आहे, की पूर्वजांनी तोंडावर बोट ठेवून सोडलेला भयंकर विषाणू...
नक्की...
प्रेमाची 'व्याख्या' काय आहे ?
शेक्सपिअर पासून गॅरी चपमनपर्यंत सगळ्या व्याख्या 'अर्थहीन' वाटतात मला,
समाज नावाच्या पिंजर्‍यात बंद करून ठेवलेल्या अनेकांच्या वेदनेपुढे...
म्हणून..
शाहरुख पासून देवगन पर्यंत गिटार वाजवत सांगितलेली सिनेमॅटिक मोहब्बत सिनेमागृहातून बाहेर पडल्यानंतर फाडुन टाकतो मी तिकीटासोबत.....
अनलिमिटेड डाटा मध्ये बंदिस्त केलेलं आजकालच प्रेम गुंडाळून टाकतो मी त्यांनी ऑल डिलिट केलेल्या सर्च हिस्टरी सारखं...
धनंजय माने च्या लिंबू कलरच्या साडी पासून,
ते जांबुवंत कचरू मानेच्या काळ्या चिमणी पर्यंत, सगळ्या भावनांची 'राख' अनेकांच्या वरातीत उडवतो मी त्यांच्या'आतल्या घुसमटी'सोबत....
आज कालचं थोतांड प्रेम अडकलय लॉजच्या दरवाज्याच्या कडीत कलम चारशेवीसप्रमाणे...
कितीही मोठी 'टॉर्च' लावली तरी स्पष्ट दिसताेय मला वाळवीने पोखरलेल्या विवाहसंस्थेच्या बुडाखालचा'अंधार'...
प्रेमाच्या वाटेवर जात असताना 'जात' नावाच्या विस्तवातून भाजून निघालेल्या असंख्य पोरांच्या थडग्यावर,
मी गिरवत बसणार नाही 
लोकांनी कंडोम सारख्या वापरून फेकलेल्या
प्रेम संकल्पना.....
त्यांच्या तथाकथित सौंदर्यशास्त्राला गर्भनिरोधक गोळ्या दिल्यात मी...
कारण..
कायद्याच्या चौकटीत,फायद्याच्या वळकटीत न बसणारं प्रेम, समाजाला कधी कधी गांजाड्याने निर्माण केलेली नशा वाटतं...
म्हणून...
उध्वस्त झालेल्या रंगहीन भावनांच्या गर्भात तु ठरवलेल्या गुलाबी रंगाला जाऊन विचार 'प्रेमाची व्याख्या काय आहे ??
तोपर्यंत.. 
मी मात्र प्रेमाच्या सगळ्या व्याख्या 'चुलीत घालून' जाळ करून शेकत बसतो नवीन 'व्याख्या' जन्माला घालण्यासाठी...

-विशाल शिरतोडे