प्रिय न्यूटन, 

         माणसं झाडाखाली बसतात नेहमीच... कधी गावाची मापं काढत तर कधी फालतू चर्चेचा उच्चांक गाठत. झाडाखाली बसल्यानंतर बऱ्याच लोकांच्या अंगावर सफरचंद देखील पडतं. काहीजण ते खाऊन टाकतात. काही लोक ते  फेकून देतात. गप्पात रंगलेली आंबटशौकीन माणसं कधीकधी सफरचंदाला वेगवेगळ्या उपमा देतात आणि सगळंच हसण्यावारी नेतात. पण ते खालीच का पडलं? असा विचार मात्र कधीच कुणीही करत नाही. जो ऐतिहासिक विचार तुझ्या मनात आला. न्यूटन... अंगावर पडलेल्या सफरचंदाला मस्तपैकी खायचं सोडून तू त्याला वैश्विक संशोधनाचा भाग बनवलंस.  सफरचंद अंगावर पडणं हा जागतिक पातळीवरील वैज्ञानिक सिद्धांताचा मुद्दा होऊ शकतं हे कितीही गाढ झोप लागली तरी कुणाच्याहि स्वप्नात येऊ शकणार नाही, ते तू जगापुढे वास्तवात आणून दाखवलंस. अंगावर पडलेल्या सफरचंदाला इतिहासात अजरामर केलंस  आणि जगातला एक महत्त्वाचा शोध लावलास. कदाचित हे तुझ्या आणि विज्ञानाच्या नात्यातलंच गुरुत्वाकर्षण होतं. जे तुला संशोधनाच्या दिशेने खेचत होतं आणि तुझ्या विक्षिप्त मनातून संक्षिप्त शोध जगासमोर येत होता. 

न्यूटन,
        ज्या काळात सबंध जगामध्ये ख्रिश्चन धर्माचे स्तोम माजले होते त्या सतराव्या शतकात 1642 झाली ख्रिसमसच्या दिवशीच तुझा जन्म झाला. पण तुला तुझा बाप पाहता आला नाही. बापाने अंगाखांद्यावर खेळवायचं सुख तुला कधी मिळालंच नाही. नियतीने ते तुझ्या वाट्याला येऊ दिलं नाही. कारण तू जगात येण्याच्या तीन महिने आधीच तुझा बाप हे जग सोडून निघून गेला होता. तुझ्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.  तिला नऊ महिने पूर्ण व्हायच्या अगोदरच तुझा जन्म झाला होता.  त्यामुळे बालपणी तू खूप अशक्त आणि कडकडीत होतास. अशातच तुझ्या आईने तुझा तीन वर्ष सांभाळ केला आणि तुला आजी-आजोबा जवळ सोडून ती आपल्यापेक्षा तीस वर्षांनी मोठ्या असणार्‍या पुरुषाशी लग्न करून निघून गेली. न्यूटन... तेव्हा तू एकटा पडला होतास रे. आई-वडिलांच्या संस्काराच्या चांदण्यात भिजून जायच्या काळात तुझ्या आयुष्यात कोरडा दुष्काळ पडला. परिस्थितीच्या चक्रव्यूहात अडकल्यामुळे तू एकलकोंडा झालास. चिडचिडी स्वभावाचा झालास. रागीट बनत गेलास. कुठल्या ना कुठल्या वस्तू गोळा करण्यात तुझे दिवस सरु लागले. शालेय जीवनात वेगवेगळ्या यंत्रांच्या प्रतिकृती,  पायात घुसणार्‍या काट्यावर इलाज करणारी चिकटपट्टी, चक्क पाण्यावर चालणारे घड्याळ,  पळणाऱ्या उंदराच्या गतीवर चालणारी पवनचक्की, भिंतीवर खुंट्या ठोकून सूर्याची किरणं पडतील अशी वेळ दाखवणारे घड्याळ अशा नानाविध वस्तू तू घरी बसून तयार केल्यास. तेव्हाच तुझ्यातला शास्त्रज्ञ हळूहळू बाहेर पडू लागला. 

न्यूटन, 
       1961 साली तू केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयात दाखल झालास. स्वतः काम करून शिकू लागलास.  कॉलेजमध्ये गेल्यावर तू रंगीबेरंगी कपडे किंवा चैनीच्या वस्तू विकत घेतल्या नाहीस तर पहिल्यांदा तू भरपूर मेणबत्त्या खरेदी केल्यास,  ज्या तुला रात्रभर अभ्यास करताना उजेड पुरवणार होत्या.  तू खूप वाचन करायचास. त्यामुळे तुला खूप प्रश्न पडायचे. ते प्रश्न तु वहीत नोंद करून ठेवायचास आणि उत्तर शोधायच्या तयारीला लागायचास. सततच्या अभ्यासाने तू इतका बुद्धिमान झाला होतास की, कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांपेक्षा तुला जास्त ज्ञान आहे, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं होतं. तू एकदा मित्रासोबत फिरायला गेला होतास. तेव्हा विशिष्ट आकाराच्या काचेतून रंगीबेरंगी सूर्यप्रकाश दाखवत असलेला एक माणूस तुला तिथे दिसला. त्याच्या हातातील लोलक बघून तुझं विचारचक्र फिरू लागलं. तुला काहीतरी गवसल्यासारखं झालं. जास्त रक्कम देऊन तू त्या माणसाकडून लोलक विकत घेतलंस. त्यावेळी लोक तुला खुळ्यात काढू लागले. पण ती प्रकाश आणि रंग यांच्या अभ्यासासाठीची खरेदी होती. तू त्याच्यावर संशोधन सुरू केलंस.  स्वतःला गाडून घेतलस आणि एक दिवस जगाला हादरा देणारा सिद्धांत मांडलास. पांढरा प्रकाश हा एकसंघ, एकरंगी नसून अनेक वेगवेगळ्या रंगाच्या किरणांच्या एकत्रीकरणातून तो बनलेला असतो. तुझा हा सिद्धांत वैज्ञानिक जगतात धुमाकूळ घालणारा सिद्धांत होता. असे जरी असले तरी तुझ्यावर प्रचंड टीका झाली. अनेक शास्त्रज्ञांबरोबर तुझे वाद झाले.  पण तुझ्या ऐतिहासिक सिद्धांतापुढे सगळे गारद झाले.

प्रिय न्यूटन, 
         तू केवळ एक शोध लावून थांबला नाहीस तर प्रयोगशाळेतच तू ठिय्या मांडलास आणि जगाला नवनवीन सिद्धांत देत राहिलास.  दुर्बीणीतील काचेचा शोध तू  लावलास. गणितात संशोधन करून चक्रवाढ व्याजाचे गणित सोडवणारं तत्व तू मांडलंस.  फोर्स ची संकल्पना मांडून गतीचे तीन नियम शोधून काढलेस. 'जर वर फेकलेला दगड खाली पडत असेल, चंद्र पृथ्वीभोवती फिरत असेल आणि इतर ग्रह सूर्याभोवती फिरत असतील तर "गुरुत्वाकर्षण" या एकाच नियमाचे ते अविष्कार आहेत, हे तू पहिल्यांदा जगाला सांगितलंस.  त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा शोध हा जगाच्या इतिहासात खळबळ माजवणारा ठरला. या शोधाला जगाने डोक्यावर घेतलं आणि तू जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून जगात पोचलास. 

न्यूटन, 
        हे आता वाटतंय तितकं सोप्प मुळीच नव्हतं रे... त्यासाठी तु तुझं आयुष्य खर्ची घातलंस.  प्रचंड मोठा त्याग केलास.  सततच्या कामामुळे तू लग्न देखील केलं नाहीस. पुढे तू ट्रिनिटी कॉलेजात प्राध्यापक झालास. तुझं "द प्रिन्सिपिया"  नावाचं पुस्तक म्हणजे वैज्ञानिक जगतातला एक महान ग्रंथ मानला जातो. तुझं " ऑब्जर्वेशन ऑफ द प्रोफेसिज" हे पुस्तक खुपच लोकप्रिय झालं. इंग्लंडच्या जगप्रसिद्ध सोसायटीचा अध्यक्ष, केंब्रीजचा खासदार,  विद्यापीठातील राज्यक्रांती समितीचा सदस्य अशा अनेक पदांवर तू काम केलंस. मात्र अखेरच्या काळात तुला मानसिक धक्क्याला सामोरे जावे लागले.  कारण सततच्या कामामुळे सार्वजनिक प्रसंग टाळण्याचा तुझा स्वभाव, अनेक शास्त्रज्ञांशी होत असलेला वाद-विवाद,  स्वतःविषयीचा पराकोटीचा आत्मविश्वास, कुणाचं काहीही ऐकून न घेण्याची प्रवृत्ती या गोष्टींमुळे तुला शेवटच्या टप्प्यात आजारपण चिटकले.  मात्र अखेरच्या श्वासापर्यंत तुझं मन संशोधनाच्या वेगवेगळ्या भराऱ्या घेत राहिलं आणि वयाच्या 83 व्या वर्षी तू लंडन शहरात  अनंतात विलीन झालास. 

प्रिय न्यूटन
             इंग्लंडमध्ये ज्या ठिकाणी राजा-महाराजांचा दफनविधी होतो, त्याच ठिकाणी तुला सन्मानपूर्वक दफन करण्यात आलं. त्यावेळी व्हॉल्टेअर म्हणाला की, "आपल्या आयुष्यात न्यूटनने विज्ञानाचे स्वरूप इतकं पालटवलं होतं की,  त्याच्या मृत्यूनंतर इतर देश एखाद्या राजाला जेवढा मान देतात तसाच मान इंग्लंड आज एका शास्त्रज्ञाला देतोय." न्यूटन तुला इंग्लंडने मृत्यूनंतर जो सन्मान दिला तसाच मृत्युपूर्वी देखील दिला होता. त्यामुळे मला असं वाटतं की, माझ्या देशात तळागाळात दडलेल्या खऱ्याखुऱ्या टॅलेंटला असंच प्रोत्साहन दिलं तर भारतात सुद्धा एखादा न्यूटन जन्माला येईल.

- मारुती शिरतोडे